नांदगाव-लाडगाव ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह ?
लाडगाव येथील जलकुंभाची सुरक्षा वाऱ्यावर! गावातील रिकामटेकडी मुले सर्रास चढतात पाण्याच्या टाकीवर…
अमळनेर तालुक्यातील लाडगाव व नांदगाव या दोन्ही गावांची संयुक्त ग्रामपंचायत आहे. या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी लाडगाव येथे जलकुंभाची उभारणी करण्यात आली आहे. या जलकुंभामुळे दोन्ही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे आणि दररोज नियमित पाणीपुरवठा केला जातो.
मात्र, या जलकुंभाची कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जलकुंभाजवळ असलेल्या लोखंडी जिन्याच्या साहाय्याने कोणीही सहज टाकीवर चढू शकतो. त्यामुळे केव्हाही घातपात, अपघात किंवा पाण्यात विष मिसळण्यासारखी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे नागरिकांनी सांगितले आहे.
कोणीही माथे फिरलेला व्यक्ती टाकीवर चढून गैरप्रकार करू शकतो. तसेच चढताना किंवा उतरतानाही पाय घसरून जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे जलकुंभाच्या सुरक्षिततेबाबत गंभीरता दाखवण्याची आवश्यकता आहे.
या जलकुंभाला संरक्षण भिंत, लोखंडी गेट किंवा तारांचे कुंपण करण्याची मागणी नागरिक अनेक दिवसांपासून करत आहेत. मात्र, ग्रामसेवक या बाबतीत उदासीन असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
