काटेरी झुडपांचा सुळसुळाट – अमळनेरच्या रस्त्यांवर अपघातांचे संकट!
सालाबादप्रमाणे दर पावसाळ्याच्या सुरुवातीला सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली काटेरी झाडे व झुडपे तोडण्याची लगबग सुरू होते. मात्र अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना अजूनही काटेरी झुडपे वाढलेली असून यामुळे समोरून येणारी वाहने वाहनचालकांना दिसत नाहीत, परिणामी अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
परिवहन महामंडळाच्या बसेस मधील प्रवाशांना देखील याचा त्रास सहन करावा लागतो. प्रवासादरम्यान डोळ्यांना किंवा हाताला झुडपांचे फटके बसतात. हे रोजचेच झाले आहे. नागरिक तक्रार करावीत तरी कोणाकडे? आणि कुठे? या अज्ञानामुळे अनेकजण हे निमूटपणे सहन करतात.
जिथे जिथे रस्ते आहेत, तिथे तिथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अस्तित्व असावे, ही अपेक्षा. मात्र, या विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी फक्त पगार घेण्यासाठी उपस्थित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कर्तव्याविषयी असलेल्या बेपर्वाईमुळे नागरिकांच्या समस्या दुर्लक्षित केल्या जात आहेत.
अमळनेर तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी याची गंभीर दखल घेऊन संबंधित विभागाकडे लक्ष वेधावे, आदेश द्यावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

