*जानवे शिवारात विहिरीत पडून शिपायाचा मृत्यू*
अमळनेर (ता. २३ मे): तालुक्यातील जानवे शिवारातील एका शेतातील विहिरीत मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायतीच्या शिपायाचा तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. २३ मे) रात्री सुमारे ८ वाजता घडली.
मृत शिपायाचे नाव दिपक बाबुलाल पाटील (वय ४५, रा. जानवे, ता. अमळनेर) असे आहे. ते जानवे ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून कार्यरत होते. गावातील पाणीपुरवठ्यासाठी असलेल्या पाच विहिरींवरील मोटारी सुरू व बंद करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती.
शुक्रवारी रात्री ते विहिरीवर मोटार सुरू करण्यासाठी गेले असताना, मोटार सुरू न झाल्याने त्यांनी पाईप हलवून ती सुरू करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अचानक तोल जाऊन ते विहिरीत पडले. ग्रामस्थांनी तातडीने त्यांना विहिरीतून बाहेर काढून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद अमळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पुढील तपास हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे करत आहेत.
